मध्य आणि पूर्व आफ्रिकेत मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता, WHO ने हा संसर्गजन्य रोग पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केला आहे.
मंकीपॉक्स आजाराची भीती आता भारतातील लोकांनाही सतावत आहे. कारण कोरोनाच्या भयंकर संसर्गाची भीती अजूनही लोकांच्या मनात आहे, त्यामुळे मंकीपॉक्ससुद्धा कोरोनासारखाच असू शकतो अशी चर्चा रंगली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. असं असतानाही या मंकीपॉक्स आजाराचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. भारत सरकार अतिरिक्त खबरदारी घेण्याचा विचार करत आहे. जानेवारी २०२२ पासून भारतात मंकीपॉक्सची केवळ ३० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नुकतेच केरळमध्ये मंकीपॉक्सचं एक प्रकरण समोर आलं आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं काय?
मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे जो व्हायरसच्या संपर्कात आल्याने होतो. व्हायरसची सुरुवातीची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी आणि स्नायू दुखणं. यानंतर जेव्हा रुग्णाचा ताप कमी होतो तेव्हा त्याच्या शरीरावर पुरळ उठतात. हे शरीराच्या वेगवेगळ्या भागात पसरतात.
मंकीपॉक्समागचं कारण काय?
माकड, उंदीर आणि खार यासारख्या मंकीपॉक्स संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे.