लखनौ – कोरोना महामारी अद्याप संपली नाही तोवर जगात मंकीपॉक्स व्हायरसमुळे चिंता वाढली आहे. जगात मंकीपॉक्सचे रुग्ण समोर येत आहेत. मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने अलर्ट जारी केला आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या प्रत्येकाच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे जे लोक अलीकडेच परदेशातून राज्यात आले आहेत. ज्याठिकाणी मंकीपॉक्स रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कात आलेत. त्या लोकांना शोधून त्यांना आयसोलेशनमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. परदेशातून राज्यात आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवावी असं त्यात म्हटलं आहे.
तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांना तोपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवावं लागेल जोवर रॅशेज असलेल्या जागेवर नवीन त्वचा येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयोसेलशन संपवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. जे लोक मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कात आले आहेत. त्या लोकांची २१ दिवसांपर्यंत आरोग्य तपासणी करावी असं मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारकडून सांगण्यात आले आहे.
कसं होतं संक्रमण?
असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल डॉक्टर्सचे महासचिव डॉ. अभिषेक शुक्ला यांनी सांगितले की, मंकीपॉक्स असलेल्या बहुतेक रुग्णांना ताप, पुरळ आणि सूजलेल्या लिम्फ नोड्स आढळतात. संसर्ग श्वसनाच्या थेंबांद्वारे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे प्रसारित केला जातो असा संशय आहे. २२ मे पर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नाही ही दिलासादायक बाब असली तरी आताच सावध राहण्याची गरज आहे.
लक्षणे ४ आठवड्यांपर्यंत टिकू शकतात
मंकीपॉक्स आजाराची लक्षणे चार आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. आतापर्यंत त्याचे रुग्ण यूके, यूएस, युरोप, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळले आहेत. हा संसर्ग ७ ते १४ दिवस टिकतो, परंतु बऱ्याच बाबतीत तो २१ दिवसांपर्यंत टिकू शकतो असं सांगण्यात आले आहे.