नवी दिल्ली-
मंकीपॉक्सचा (Monkeypox) वाढता धोका लक्षात घेत केंद्र सरकारकडून या रोगावर लस बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारनं यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) म्हणजेच टेंडर काढलं आहे. मंकीपॉक्सवर लस निर्मिती करण्याची तयारी दाखवणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या किटसाठी हे टेंडर काढलं आहे.
केंद्रानं हे टेंडर पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप मोडमध्ये जाहीर केलं आहे. यात मंकीपॉक्स लस, संशोधन किट याचा समावेश असणार आहे. इच्छुक कंपन्या आपली दावेदारी १० ऑगस्टपर्यंत दाखल करू शकणार आहेत. खरंतर मंकीपॉक्ससाठीची लस याआधीपासूनच बाजारात अस्तित्वात आहे. पण मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी प्रयत्नांचं हे पाऊल समजलं जात आहे. मंकीपॉक्सचे भारतात आतापर्यंत पाच रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय काही संशयित रुग्ण देखील आहेत. ज्यांची चाचणी झाली असून अहवालाची प्रतिक्षा आहे.
जगातील एकूम ७८ देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे १८ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण युरोपीयन देशांमधील आहेत. तर २५ टक्के रुग्ण अमेरिकन खंडातील आहेत. जगात मंकीपॉक्समुळे आतापर्यंत ५ जणांचा जीव गेल आहे. तर एकूण रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार काही गोष्टींची काळजी घेतली तर मंकीपॉक्सपासून नक्कीच बचाव करता येऊ शकतो. यात शारिरीक संबंधांवेळी काळजी बाळगणं याचाही समावेश आहे. WHO च्या मतानुसार या रोगाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. ज्यामुळे आजारी मुलं, गर्भवती महिलांपर्यंत याचा प्रसार होणार नाही.
गळाभेट आणि संक्रमितांचे कपडे वापरल्यानंही पसरू शकतो मंकीपॉक्सशारिरीक संबंधांशिवाय मंकीपॉक्स रुग्णाच्या संपर्कात आल्यानंही याचा प्रचार होऊ शकतो. जसं की गळाभेट घेणं, संक्रमित व्यक्तीचा टॉवेल किंवा बेडशीट वापरणं यातून मंकीपॉक्सचा प्रसार होऊ शकतो.