तुम्ही 'मिर्झापूर' वेब सिरीजमधील कालीन भैया आणि गुड्डू भैया यांची गोष्ट ऐकली आणि पाहिली असेल. पण, आज आम्ही तुम्हाला मिर्झापूरच्या 'कालिया'ची गोष्ट सांगणार आहोत. मिर्झापूरमध्ये दहशत निर्माण करणारा हा कालिया, माणूस नसून माकड आहे. त्याच्या नावाने महिला आणि मुले घाबरतात. कालियाने सुमारे 250 महिला आणि मुलांना जखमी केले आहे. यानंतर वनविभागाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या कालिया कानपूरच्या उद्यानातील पिंजऱ्यात कैद आहे.
काय आहे प्रकरण?पाच वर्षांपूर्वी कालिया नावाच्या माकडाने मिर्झापूरमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. महिला आणि मुले पाहून तो त्यांना चावायला धावायचा. तो फक्त महिला आणि मुलांनाच आपला बळी बनवत असे. त्याने सुमारे 250 महिला-मुलांना लक्ष्य केले. यानंतर कालियाला कानपूर झूलॉजिकल पार्कचे पशुवैद्य डॉ. मोहम्मद नसीर यांनी पकडले, तेव्हापासून कालिया कानपूर प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात कैद आहे.
स्वभावात बदल नाहीकालियाला कानपूर झूलॉजिकल पार्कमध्ये पिंजऱ्यात ठेवून 5 वर्षे झाली, पण त्याच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे त्याला सोडले जाणार नाही. त्याची 'आजीवन कारावास'ची शिक्षा कायम राहणार आहे. कानपूर प्राणीसंग्रहालयात अनेक शैतान माकडे बंद आहेत, ज्यांना आता सोडण्याची तयारी केली जात आहे, परंतु कालियाला सोडले जाणार नाही. तो जन्मठेपेतच राहील, कारण त्याच्या स्वभावात कोणताही बदल झालेला नाही. तो अजूनही हल्ला करण्यासाठी धावतो.
महिलांना पाहून इशारेकालिया महिलांना पाहून विविध हातवारे करतो आणि काहीतरी बडबडायला लागतो. त्याला तुरुंगवास होऊन 5 वर्षे झाली, पण तरीही तो महिलांना पाहून अश्लील हावभाव करतो. यासोबतच तो हल्ला करायलाही धावतो. त्यामुळे त्याला पिंजऱ्याच्या बाहेर काढता येत नाही. डॉ मोहम्मद नसीर यांनी सांगितले की, कालिया पूर्वी एका तांत्रिकाकडे होता. तो त्याला खायला मांस आणि प्यायला दारू द्यायचा. त्यामुळे त्याचा स्वभाव खूप हिंसक झाला आहे. तांत्रिक मेल्यावर त्याने लोकांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्यानेच माकडाला हातवारे शिकवले असतील, असा अंदाज आहे.