लहान मुलांना पत्ता विचारत होते साधू, मुले पळवणारी टोळी समजून जमावाने केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:58 AM2021-07-20T10:58:27+5:302021-07-20T10:58:42+5:30
Madhya pradesh dhar: या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
धार: मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील धार (Dhar) जिल्ह्यात दोन साधुंना जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्या साधुंचा गुन्हा एवढाच होता की, त्यांनी लहान मुलांना पत्ता विचारला. यानंतर जमावानं त्या दोघांना मुलं पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील धन्नड गावातून दोन साधू कारनं जात होते. यावेळी त्यांनी रस्त्यात कार थांबवून काही मुलांना पत्ता विचारला. त्या साधुंना पाहून मुलं घाबरली आणि आरडाओरड करुन पळू लागली. यानंतर जमावानं त्या साधुंना मुले पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीदरम्यान लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. तसेच, मारहाणीनंतर त्या दोघांना जमावाने पीथमपूर पोलिसांच्या स्वाधिन केले. धारचे अॅडिशनल एसपी, देवेंद्र पाटीदार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सेक्टर-1 मध्ये साधुंना मारहाण केल्याची माहिती मिळाली. सध्या ते दोन्ही साधू आमच्या ताब्यात असून, आम्ही पुढील चौकशी करत आहोत.
पालघरमध्ये जमावाकडून दोन साधुंची हत्या
मुंबई जवळील पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दरोडेखोर समजून 16 एप्रिल 2020 रोजी दोन साधू आणि गाडीच्या चालकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी नाराजीचा सूर आळवत यातून दोषींची सुटका नाही हे ठामपणे सांगितलं होतं.