नवी दिल्ली: जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मान्सुनचे गणित बिघडत चालल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे कोरोनाचे संकट संपूर्ण देशात तीव्र आणि अधिक गडद होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे पीकांची वाहतूक, वितरण आणि विक्रीसाठी निर्बंध आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे. मात्र, या सर्व परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने बळीराजासाठी दिलासादायक माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (monsoon 98 percent rain for all over country this year imd forecast)
केंद्रीय हवामान विभागाने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. यंदाच्या मान्सूनच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाच्या मौसमात पावसाचा अंदाज हा सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के दरम्यान लॉग पिरियड एव्हरेज (एलपीए) असा असेल, असे सांगितले जात आहे.
Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग
कुठे सरासरीपेक्षा अधिक पाऊस
महाराष्ट्रासह, गुजरात, गोवा यासारख्या राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो.
देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील?
एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार पाऊस आणि मान्सून याचा अंदाज लावला जातो.