गुजरात आणि राजस्थानसह भारताच्या अनेक भागात रविवारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मान्सून आता देशाच्या उत्तरेकडील राज्यांकडे सरकला आहे. पावसाशी संबंधित घटनांमुळे देशभरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, सौराष्ट्राला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रावर चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पाऊस पडत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुसळधार पावसामुळे सूरत, भुज, वापी, भरूच आणि अहमदाबाद शहरांमध्ये पाणी साचलं आणि सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली, काही रस्ते पाण्याखाली गेले. सूरत जिल्ह्यातील पलसाना तालुक्यात अवघ्या दहा तासांत १५३ मिमी पाऊस झाला, जो राज्यातील सर्वाधिक आहे.
गुजरातमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. येत्या दोन दिवसांत दक्षिण आणि मध्य गुजरात आणि सौराष्ट्र भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीनेही २ जुलैपर्यंत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनच्या पहिल्या दिवशी २९ तारखेला सकाळी २२८.१ मिमी पाऊस झाला. १९३६ नंतरचा जून महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस होता, त्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आणि अनेकांना जीव गमवावा लागला.
रविवारी राजस्थानच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. चुरू येथे सर्वाधिक ५१.४ मिमी पावसाची नोंद झाली, तर शहरातील तापमान ४०.२ अंश सेल्सिअसवर राहिले. गेल्या २४ तासांत भरतपूर विभागातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पुढील ४-५ दिवसांत पूर्व राजस्थानच्या काही भागात मुसळधार आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान श्री गंगानगर येथे ४१.३ अंश नोंदवले गेले.
हवामान खात्याने 3 जुलैपर्यंत जम्मू विभागात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर ४ ते ७ जुलैपर्यंत बहुतांश ठिकाणी मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडेल. IMD ने अचानक पूर, भूस्खलन आणि दगड कोसळण्याचा इशारा देखील जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील हल्द्वानी, रामनगर, डेहराडून, उत्तराखंडमधील हरिद्वार, मुरादाबाद, पाटणा आणि हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत.
लोणावळा शहरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सगळ्यांना जीव गमवावा लागला आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ५ जण धरणात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी २ जणांचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाकडून सुरु आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.