मान्सून वेळेआधीच दाखल; केरळमध्ये तीन दिवस आधीच आगमन, राज्यात १० जूनपर्यंत येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:30 AM2022-05-30T06:30:37+5:302022-05-30T06:30:43+5:30
राज्यात पूर्वमाेसमी पावसाची दमदार हजेरी लागेल असा आला आहे.
नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम : उकाड्याने हैराण झालेल्या देशवासीयांसाठी आनंदवार्ता आहे. मान्सूनचे केरळमध्ये धडाक्यात आगमन झाले आहे. नियमित वेळेपेक्षा तेथे तीन दिवस मान्सून दाखल झाला असून, केरळसह तामिळनाडू, अंदमान आणि निकाेबार द्वीपसमूह, दक्षिण कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात पूर्वमाेसमी पावसाची दमदार हजेरी लागेल असा आला आहे. हवामान खात्याने २७ तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल हाेईल, असा अंदाज वर्तविला हाेता.
सतर्कतेचा इशारा
उद्यापासून पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या राज्यांतही पाऊस
बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश इत्यादी भागात पूर्वमाेसमी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनची पुढील वाटचाल संथगतीने राहू शकते. मान्सून अंदमानमध्ये रखडला आहे. कर्नाटक, गाेवा तसेच पूर्व आणि ईशान्येकडील भागात प्रतीक्षा करावी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.