पुणे : कोरोना विषाणुच्या विरोधात संपूर्ण देश लढत असताना हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाची सुखद खबर दिली आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा सोमवारी भारतीय हवामान विभागाने केली आहे. यापूर्वी यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा थोडा उशिरा ५ जूनला केरळच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे जाहीर केले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. यामुळे मॉन्सूनचे वारे खेचून आणल्याने केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्याचे आज जाहीर करण्यात आले.
देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना सुखद बातमी समोर आली असून, गेले काही दिवस अंदमान समुद्रात थबकलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केली होती. मॉन्सूनने बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रातील बहुतांश भाग, अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केल्याने हवामान विभाग सतर्क झाला होता. मालदीव कॉमोरिन भाग आणि लगतच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मॉन्सूनच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रात १६ मे रोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. १७ मे रोजी तो आणखी थोडा पुढे सरकला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे गेल्या दोन तीन दिवसांत जोरदार पुढे वाटचाल केली होती.त्यामुळे हवामान विभागाचा यावेळी अंदाज खरा ठरवत केरळमध्ये मॉन्सून १ जून रोजी दाखल झाला आहे.
हवामान विभागाने देशातील मागील ३० वर्षाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखांचा अभ्यास करुन विविध ठिकाणी मॉन्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. तरीही केरळमधील मॉन्सूनच्या आगमनाची तारीख १ जून हीच कायम ठेवली आहे. मॉन्सूनची वाटचाल कशी असेल व देशातील विविध भागात कसा व किती पाऊस होईल,याचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज आज दुपारी हवामान विभाग जाहीर करणार आहे़........
गेल्या ५ वर्षातील केरळला मॉन्सूनच्या आगमनाचा तारखा २०१५- ५ जून ३० मे२०१६ -८ जून ७ जून२०१७ - ३० मे ३० मे२०१८ - २९ मे २९ मे२०१९ - ८ जून ६ जून