मुंबई - बरेच दिवस लांबलेला मान्सून अखेर आज मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते, अखेर आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेरीच 1 जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर तब्बल आठवडाभराने आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान, केल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. मात्र मान्सूनचे केरळमधील आगमन लांबल्याने महाराष्ट्रामध्येही मान्सून थोडा उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत १३ जूननंतरच मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मुंबईसाठी अंदाज ८ आणि ९ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २९ अंशाच्या आसपास राहील. मुंबई ३४.९ अंशावर मुंबईचे कमाल तापमान अद्यापही ३४ ते ३५ अंशावर स्थिर आहे. आर्द्रता ६५ टक्क्यांच्या आसपास आहे. मागील तीन दिवसांपासून शहर आणि उपनगरावर ढग दाटून येत आहेत. प्रत्यक्षात सरींचा मात्र पत्ता नाही. सकाळी दाटून येत असलेले ढग दुपारी मात्र विरळ होत आहेत. परिणामी, मुंबईकरांना ‘ताप’दायक सूर्यकिरणांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात येणारे चढउतार मुंबईकरांना घाम फोडत आहेत. राज्यासाठी अंदाज८ जून : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.९ जून : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.१० आणि ११ जून : विदर्भात उष्णतेची लाट येईल.
आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 12:34 PM