नवी दिल्ली : अंदमानातून निघाल्यानंतरही पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नसल्यामुळे मान्सूनचे आगमन नियमित वेळापत्रकापेक्षा तीन ते चारदिवस दिवस लांबणार आहे. येत्या ४ जून रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान विभागाच्या मान्सून पूर्वानुमान विभागाचे प्रमुख डी.एस. पाई यांनी रविवारी ही माहिती दिली. मान्सूनच्या प्रगतीसाठी तूर्तास स्थिती अनुकूल नाही. त्यामुळे मान्सूनचे आगमन लांबणार आहे. मान्सूनच्या अंदमानापर्यंतच्या प्रवासानुसार, तो ३० मे रोजीच केरळात दाखल होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.२१ मेपर्यंत नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या खाडीत व श्रीलंकेच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचले. मात्र यानंतर आठवडाभर येथेच अडकून बसले. अरबी समुद्रातील प्रतिचक्रवातामुळे मान्सूचा वेग मंदावला आहे. येत्या ४ जूनपर्यंत स्थिती अनूकूल होऊन मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकेल, अशी अपेक्षा असल्याचे पाई म्हणाले. मान्सून त्याच्या लहरीपणासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा यामुळे हवामान खात्याचे अंदाज चुकताना दिसतात. यंदा श्रीलंकेच्या हमबनटोटा येथे मान्सून अडकून बसला आहे.आंध्रात आणखी ४१ उष्मा बळीदेशाच्या अनेक भागांत उष्णतेचा कहर जारी असून गत २४ तासांत आंध्र प्रदेशात उष्माघाताने आणखी ४१ जण मृत्युमुखी पडले आहेत. देशभरातील उष्माघाताच्या बळींची संख्या २२४८ वर पोहोचली आहे. आंध्रातील बळीसंख्या १६७७ झाली आहे. तर शेजारच्याच तेलंगणा राज्यात आत्तापर्यंत ५४१ जण मृत्युमुखी पडले आहेत. नागपुरात रविवारी सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मान्सूनची तारीख चुकणार; गुरुवारी केरळ किनाऱ्यावर धडकणार
By admin | Published: June 01, 2015 2:05 AM