नवी दिल्ली: नैऋत्य मोसमी पावसाचे त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा एक आठवडा उशिराने का होईना गुरुवारी भारतात आगमन झाले. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची घोषणा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) केल्याने चिंतेचे ढग काहीसे विरळ झाले.
पुढील २४ तासांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, केरळच्या उर्वरित भागांमध्ये तसेच तामिळनाडूच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम मध्य व ईशान्य भागात मान्सून पोहोचणार आहे.
बिपोरजॉय आता पाकिस्तानच्या दिशेने निघाल्यामुळे मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्याचे आयएमडीने गुरुवारी जाहीर केले.
मुंबईत कधी?
मान्सून साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. यंदा १८ जूनला मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा आहे. कमी अधिक ४ दिवसांचा फरक जमेस धरला तर त्याचे आगमन १४ ते २२ जूनच्या दरम्यान होईल.
१५० वर्षांत बदलली तारीख
आयएमडी माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची तारीख गेल्या १५० वर्षांमध्ये वेगवेगळी राहिली. ११ मे १९१८ रोजी वेळेपेक्षा खूप आधी आणि १९७२ मध्ये १८ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. पश्चिम किनाऱ्यावरही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण राहील. मध्य भारतात दुसऱ्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस राहील. - कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान खाते.
१२ जूनपर्यंत मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी