नवी दिल्ली : या महिन्यात देशाच्या अनेक भागांत मान्सून क्षीण झाल्यामुळे हंगामातील एकूण पर्जन्यवृष्टी सामान्य पातळीहून ५ टक्क्यांनी खाली घसरली आहे. यंदा सरासरीच्या ५ ते ६ टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पाऊस कमी झाला असला तरी जलाशये आणि पिकांची स्थिती उत्तम आहे. जुलै आणि आॅगस्टमधील दमदार पावसामुळे एकूण पीक परिस्थिती उत्तम असली तरी देशाच्या काही भागांतील पिकांबाबत मात्र चिंता वाटते, असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये पूर्व व ईशान्य भाग वगळता सामान्य पातळीहून १९ टक्के कमी पाऊस झाला. पूर्व व ईशान्य भागात ६६ टक्के अतिरिक्त सरी कोसळल्या. उर्वरित सर्व राज्यांत या महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे तेथे पावसाची ४० ते ५० टक्के तूट आहे. ही तूट या आठवड्यातील पावसाने भरून येईल, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले. मान्सूनचे अचूक भाकीत वर्तविण्यात ही संस्था सर्वात पुढे आहे. ‘सध्या पावसाचे प्रमाण सामान्य पातळीहून खाली आहे. तथापि, याचा अर्थ पाऊस अपुरा झाला असा नाही. पावसाची तूट येत्या काळात काही प्रमाणात भरून निघेल’, असे या विभागाचे संचालक डी. एस. पै यांनी सांगितले. नैऋत्य मान्सूनचा हंगाम ३० सप्टेंबरला संपत असून, त्यानंतर कोणत्या घटकांंचा पावसावर परिणाम झाला हे तपासले जाणार आहे. १० आॅक्टोबर रोजी आम्ही मान्सून हंगामाबाबतचा अहवाल सादर करू. हंगाम संपण्यासाठी थोडा अवधी उरला असल्यामुळे आम्ही आता आमच्या भाकितात बदल करणार नाही, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएमडीने मान्सून सुरू होताना जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या १०६ टक्के पर्जन्यवृष्टी होईल, असे भाकीत केले होते. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.ने एप्रिलमध्ये सरासरीच्या १०५ टक्के, तर आणखी एक खासगी संस्था व्हेदर रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिेसस लि.ने ईशान्येकडील भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात पाऊस सरासरीच्या १०४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला होता.
सामान्य पातळीहून कमी बरसला मान्सून, तूट ५ टक्के
By admin | Published: September 14, 2016 5:37 AM