मुंबई: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली आहे. यंदाच्या पावसावर अल निनोचा परिणाम जाणवेल, असं स्कायमेटनं म्हटलं आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 55 टक्के असेल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा केरळात मान्सून 1 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज आहे. यंदाच्या पावसावर अल निनोचा प्रभाव जाणवेल. पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया, भारताच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असा धोक्याचा इशारा स्कायमेटनं दिला आहे. तर अमेरिकेच्या मध्य पश्चिम भागासह ब्राझीलमध्ये जोरदार पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यानं भारताच्या दृष्टीनं पाऊसमानाचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. भारतातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात. शेतीचं देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेतलं योगदान 14 टक्के असलं तरी, यामुळे देशातल्या 1.3 अब्ज लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळेच पावसाबद्दल व्यक्त करण्यात येणाऱ्या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
'पाणीबाणी'ची भीती; अल् निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 3:10 PM