कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही?; अविश्वास ठरावावरुन सोनियांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 03:10 PM2018-07-18T15:10:30+5:302018-07-18T15:10:47+5:30
शुक्रवारी मोदी सरकारची पहिली अग्निपरीक्षा
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणलं आहे. टीडीपीच्या खासदारांनी सरकारविरोधात आणलेला अविश्वास ठराव लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला आहे. या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे. सरकारविरोधात पुरेसं संख्याबळ नसताना हा प्रस्ताव कसा मंजूर होणार?, असा प्रश्न काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारण्यात आला. यावर कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही?, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्ताव स्वीकारल्यावर सोनिया गांधी संसदेच्या बाहेर पडल्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना संख्याबळाबद्दल प्रश्न विचारले. 'तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे का? संख्याबळाअभावी तुम्हाला प्रस्ताव मंजूर करुन घेता येणार नाही,' असं पत्रकारांनी म्हटलं. यावर कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही?, असा प्रश्न पत्रकारांनी सोनिया गांधी यांनी विचारला. टीडीपीकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे.
मोदी सरकारविरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव आज लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे. काँग्रेस आणि टीडीपीच्या खासदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. पन्नास खासदारांचा पाठिंबा असल्यास अविश्वास प्रस्ताव दाखल करुन घेतला जातो. टीडीपी खासदारांनी दाखल केलेल्या प्रस्तावाला 50 पेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा असल्यानं लोकसभेच्या अध्यक्षांनी तो दाखल करुन घेतला. आता या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे.