Lok Sabha Speaker News: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, लोकसभेत मंगळवारी घडलेल्या एका घटनेमुळे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) चांगलेच संतापले. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांवर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला.
काय म्हणाले ओम बिर्ला?जोपर्यंत सभागृहात शिस्तीचे पालन होत नाही, तोपर्यंत आपण सभापतींच्या आसनावर बसणार नसल्याचे ओम बिर्ला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, त्यांच्यासाठी सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. सभागृहात शिस्त राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. सभागृहातील काही सदस्यांची कृती सभागृहाच्या परंपरांच्या विरोधात आहे.
मंगळवारी नेमकं काय घडलं?मंगळवारी (1 ऑगस्ट) लोकसभेत मोठी गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी तर केलीच, पण अध्यक्षांच्या आसनाकडे पत्रकंही फेकली. या गोंधळामुळे ओम बिर्ला चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे, आजही(बुधवार) ओम बिर्ला लोकसभेत गेले नाहीत. सर्व पक्षांना इशारा देत ते म्हणाले की, तुम्ही जोपर्यंत सभागृह सुरळीत चालू देणार नाहीत, तोपर्यंत मी आत जाणार नाही.