नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.
अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, आम्हाला वाटले होते की राहुल गांधी चर्चा सुरू करतील पण ते बोलायला तयार नाहीत, कदाचित ते सकाळी उशीरा उठले असतील. मणिपूरबाबत दुबे म्हणाले की, मी स्वतः मणिपूरच्या इतिहासाचा बळी आहे. सुरक्षा दलात उच्च पदावर असलेल्या माझ्या नातेवाईकाला अतिरेकी हल्ल्यात आपला पाय गमवावा लागला होता. काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असं म्हणत हा प्रस्ताव विरोधकांच्या एकीसाठी आणला असल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला.
विरोधी एकजुटीवर निशाणा साधत निशिकांत दुबे म्हणाले की, विरोधी पक्षात बसलेले काही लोकच भारताचे पूर्ण रूप सांगू शकतील. सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी लढत आहेत पण तरीही केंद्रात युती करत आहेत. लालू यादव यांना आम्ही तुरुंगात पाठवले नाही, काँग्रेसने त्यांना तुरुंगात पाठवले. ममता बॅनर्जी यांच्यावर काँग्रेसने आरोप केले आम्ही नाही. तसेच शरद पवारांना कोणी हटवले? असा सवाल करत काँग्रेसला कंटाळूनच शरद पवार यांनी स्वतंत्र्य पक्ष काढला, असं दुबे यांनी सांगितले. तसेच सोनिया गांधी यांना मुलाला सेट आणि जावयाला भेट करायची आहे. यासाठीच त्यांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, असा टोलाही दुबे यांनी लगावला. दुबेंच्या या विधानावर सोनिया गांधी यांनाही हसू आले.
मणिपूरला फटका बसला तर भारतालाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. संपूर्ण भारताबद्दल बोलतो. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे, असा संदेश यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मौन व्रत घेतले. ते लोकसभेतही काही बोलणार नाहीत आणि राज्यसभेतही काही बोलणार नाहीत. त्यामुळेच आम्हाला पंतप्रधान मोदींचं मौन व्रत अविश्वास ठरावाद्वारे तोडायचे आहे, असं गौरव गोगाई यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत? असा सवालही गौरव गोगोई यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले? पंतप्रधान मोदींकडून शोक किंवा शांततेचे आवाहन का झाले नाही? मंत्र्याला बोलण्यापासून कोणी रोखत नाही, पण पंतप्रधान मोदींच्या बोलण्याचं वजन कोणत्याही मंत्र्यामध्ये नाही. आमचा तिसरा प्रश्न आहे की, पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही. गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री बदलले, उत्तराखंड, त्रिपुरामध्येही मुख्यमंत्री बदलले. पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आशीर्वाद का?, असे विविध सवाल गौरव गोगाई यांनी उपस्थित केले.