Monsoon Session Of Parliament : संसदेत विरोधी पक्षांच्या हालचालींवर 'नजर'! काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 05:59 PM2018-07-23T17:59:27+5:302018-07-23T17:59:49+5:30
लोकसभेचे कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नजर ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला.
नवी दिल्ली - लोकसभेचे कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नजर ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला. दरम्यान, या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
सोमवारी सकाळी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरुवात झाल्यावर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले," अधिकाऱ्यांच्या गॅलरीत बसलेले एक अधिकारी वारंवार उठून विरोधी सदस्यांवर लक्ष ठेवत आहेत. तसेच त्याचे टाचण तयार करत आहेत, असा आरोप केला. अधिकारी त्याठिकाणी बसून टिपणे लिहू शकत नाहीत. आमच्यावर लक्ष ठेवले जात आहे. तसेच खासदारांची मोजणी केली जात आहे. त्यांना परवानगी कशी काय मिळाली.? दरम्यान, हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सदर अधिकारी तिथून उठून गेल्याचा दावाही खर्गे यांनी केला.
खर्गे यांनी केलेल्या आरोपांची दखल घेताना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या, " मी अधिकाऱ्यांच्या गॅलरीकडे पाहू शकत नाही. मात्र या विषयाची माहिती घेऊ, त्या गॅलरीमध्ये अधिकारी बसू शकतात. त्याशिवाय टीव्हीवरही याचे प्रक्षेपण होत असते. तरीही आपण या विषयात लक्ष घालू,
तर खर्गे यांच्या आरोपांना उत्तर देताना संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की संबंधित अधिकारी संसदीय कामकाज मंत्रालयाचे अधिकारी असून, ते तिथे बसू शकतात. तर या मुद्द्यावरून काँग्रेसला टोला लगावताना प्रकाश जावडेकर म्हणाले, संसदेच्या कामकाजाचे प्रक्षेपण टीव्हीवर होते. तिथे सगळे काही दिसते. अगदी कुणी डोळा मारला तरी तो दिसतो."