देशभरात गेल्या काही काळापासून उष्णता आणि पावसाने लपंडाव खेळण्यास सुरुवात केली आहे. यातच रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज होता. तो हुकला आहे. यामुळे आता महाराष्ट्रातही मान्सूनला पोहोचण्यास विलंब होणार आहे. हा विलंब आणखी तीन ते चार दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये तीन जून नंतर आणि महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज होता. परंतू केरळमध्ये येण्यास अद्याप तीन ते चार दिवस लागू शकतात असा हवामान विभागाचा अंदाज आला आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून येण्यास १५ जून उजाडण्याची शक्यता आहे. या साऱ्या घडामोडींवर विविध शहरांचा पारा वाढू लागला आहे. यामुळे तिथे मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
मान्सूनला अद्याप वेळ असला तरी, राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, आदी भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागात शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अंगावर झाड, दगड कोसळून ४ तर वीज पडून ७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नंदुरबार, बीड, जळगाव, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील घटनांचा समावेश आहे. वृक्ष आणि विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. पिकांचे नुकसान व पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा इशाराहवामान खात्याच्या अंदाजानुसार, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसासह जोरदार वादळाची स्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा येथे हवामान कोरडे राहू शकते. त्याच वेळी, स्कायमेटच्या मते, पुढील 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि केरळ, तामिळनाडू, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, ओडिशाचा दक्षिण किनारा आणि किनारपट्टीवर एक किंवा दोन जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.