जून महिना सुरू झाला तरी उन्ह कायम आहे. उन्हाच्या लाही-लाहीने त्रस्त झाले सर्वच लोक पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांत संपूर्ण देशातच उन्हाचा पारा आणि उकाडा वाढला आहे. यामुळे सर्वच जण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. यातच आज मान्सून केरळमध्ये येण्याची शक्यता असून 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचलेले र्नैऋत्य मोसमी वारे पुढे-पुढे सरकत आहे. हे वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांतही पोहोचले आहे. तसेच श्रीलंका, मालदीव आणि कोमोरीनचाही बरासचा भाग या वाऱ्याने व्यापला आहे. यामुळे आज केरळमध्ये मान्सून पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र महाराष्ट्राला अद्याप मान्सूनची प्रतिक्षा आहे.
महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार मान्सून? - भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे हवामानातही सातत्याने बदल होताना दिसत आहे. परिणामी कधी पाऊस तर कधी ऊनही पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात -मान्सूनला अद्याप प्रतिक्षा असली तरी, राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, आदी भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे.