- विकास झाडे
नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय तातडीने घ्या अन्यथा या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळेल व तुमची (केंद्र सरकारची) फजिती होईल असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते बिंदर सिंह गोलेवाला यांनी केंद्र सरकारला दिला आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे. दिल्लीच्या सर्व सीमा जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी अडविल्या असून कृषी कायदे मागे घ्यावेत व ‘एमएसपी’ कायदा आणावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाहीत. दिल्ली - एनसीआरचे हवामान आरोग्यास अपायकारक आहे. कडाक्याची थंडी आहे. तशाही परिस्थितीत शेतकरी जिद्दीने सीमेवरती बसले आहेत. या एक महिन्याच्या काळात ३५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारतर्फे शेतकरी नेत्यांना दोनवेळा लेखी प्रस्ताव पाठविण्यात आलेत आणि आम्ही चर्चेला तयार आहोत असे कळविले आहे. परंतु केवळ कायद्यात सुधारणा करू हेच सांगितले जाते. त्यापेक्षा पुढची पायरी चढायला सरकार तयार नाही.
४८ तासांची वेळ उत्तर प्रदेश प्रवेशद्वारावर गुरुवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विजय हिंदुस्थानी यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्टर रंगवले व निदर्शने केलीत. त्यांनी कायदे परत घेण्यासाठी सरकारला ४८ तासांचा वेळ दिला आहे. बास्केट बॉल खेळाडू सतनाम सिंह यांनी सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना समर्थन दिले. त्यांची सेवाही केली.
रस्ते जामगेला महिनाभर आंदोलनामुळे दिल्लीतील रहदारीचे रस्ते मोठ्या प्रमाणात जाम होत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी मथुरा आणि आग्रा येथून आलेल्या शेतकऱ्यांना महामाया उड्डाणपुलावर अडविण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग जाम होता.