मुंबई, दि. 8- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैदराबादमध्ये येणार असल्याचं समजतं आहे. 28 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी इवांका ट्रम्प हैद्राबादमध्ये येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या परिषदेला हजेरी लावणार आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2010मध्ये ही परिषद सुरू केली असून यंदाचं परिषदेचं हे आठवं वर्ष आहे. जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदींनी इवांका यांना भारतात येण्यासाठी
निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं. मी इवांका यांना भारतात यायचं निमंत्रण दिलं आहे. मला विश्वास आहे की त्या हे निमंत्रण नक्की स्वीकारतील, असं मोदी म्हणाले होते.
मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून मोदींचे आभार मानले होते. भारतात होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी मला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं, यासाठी धन्यवाद, असं ट्विट इवांका ट्रम्प यांनी केलं होतं. गेल्या दिड महिन्यापासून या परिषदेसंदर्भात नवी दिल्ली, वॉशिंग्टन आणि हैदराबादमध्ये चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, परिषदेसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू हे तीन पर्याय होते. पण हैदराबाद शहरात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने सगळ्या पायाभूत सुविधा असल्याते त्या शहराची निवड झाल्याचं, सूत्रांकडून समजतं आहे.
जागतिक उद्योजगता परिषदेचं पहिल्यांदा 2010 साली वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्तंबूल, दुबई, कुआलालम्पूर, मार्राकेश, नैरोबी आणि सिलिकॉन व्हॅली या ठिकाणी परिषद पार पडली. जून 2016मध्ये मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 2017 सालाची परिषद भारतात होणार असण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला होता. एका संयुक्त अहवालातून ही माहिती देण्यात आली होती.