नवी दिल्ली : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात मनुष्यबळाची कमतरता असल्याची कबुली देतानाच सरकारने राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या कोणत्याही स्मारकाची देखरेख ठेवण्यात कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष केले नसल्याचा खुलासा केला आहे.राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) महेश शर्मा लेखी उत्तरात म्हणाले की, सरकारकडून कोणत्याही स्मारकाकडे दुर्लक्ष झालेले नाही किंवा त्यांचे विद्रुपीकरण होऊ दिलेले नाही. पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे स्मारके नष्ट किंवा त्यांची अवस्था वाईट होत आहे काय, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकाचा उल्लेख करताना त्यांनी तेथे आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी सरकारने काय केले हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. संरक्षित स्मारकांच्या संरक्षणासाठी त्या त्या ठिकाणी सूचनाही लावण्यात आल्या. सध्या झाशीच्या किल्ल्यात सात स्मारक परिचर तर राणी लक्ष्मीबाई महालात सहा परिचर नियुक्त करण्यात आले आहे. या दोन्ही स्मारकांची हेळसांड होऊ दिली जात नाहीय. (प्रतिनिधी)
झाशीच्या राणींची स्मारके दुर्लक्षित नाहीत
By admin | Published: July 22, 2015 11:49 PM