लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : इस्रोने सोमवारी (दि. १४) तिसऱ्यांदा ‘चंद्रयान-३’ची कक्षा घटवली. यामुळे आता चंद्रयान १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत आले आहे. म्हणजेच चंद्रयान आता चंद्रापासून किमान अंतर १५० किमी व कमाल अंतर १७७ किमी असलेल्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.
कक्षा घटवण्यासाठी यानाचे इंजिन काही काळ सुरू करण्यात आले होते. आता चंद्रयानाच्या कक्षा परिक्रमेचा टप्पा सुरू झाला आहे. म्हणजेच चंद्रयान लंबवर्तुळाकार कक्षेतून वर्तुळाकार कक्षेत येऊ लागले आहे.
इस्रो आता पुढील प्रक्रिया १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता करील. यात इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयातील शास्त्रज्ञ चंद्रयानाला १०० किमी X १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत आणतील. म्हणजेच चंद्रयान चंद्राभोवती १०० किमीच्या कक्षेत फिरेल.
१७ ऑगस्टला पहिली परीक्षा
चंद्रयानासाठी १७ ऑगस्ट हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण, या दिवशी इस्रो ‘चंद्रयान-३’चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे करणार आहे. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी चंद्रयानाची कक्षा घटवण्यात आली होती, त्यानंतर ते १७४ किमी x १४३७ किमीच्या कक्षेत आले होते.