उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतक्या वेगाने पसरली की इमारतीतील पहिल्या मजल्यावरील लोकांना इमारती बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे होरपळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. याच घरामध्ये आज लग्न होणार होतं. विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी शमा परवीन या मुरादाबादमध्ये आपल्या माहेरी आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर त्या आपली आई आणि मुलांसह राहत होत्या. पण या आगीत त्यांचा मृत्यू झाला आणि हसतं खेळतं घर उद्धवस्त झालं आहे. ज्या घरात सनईचे सूर ऐकू येणार होते, तिथेच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मुरादाबादच्या गलशहीद परिसरात राहणाऱ्या जावेद कुरेशी यांच्या दोन मुलीचं 26 ऑगस्ट रोजी लग्न होतं. घरामध्ये आनंदाचं वातावरण असून लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. मुरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.