Gujarat Morbi Bridge Collapse:गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी करत आहेत. दरम्यान, मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या 140हून अधिक झाली आहे.
दुर्घटनेनंतर तात्काळ विविध विभागांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी मोरबीमध्ये रात्रभर मुक्काम करून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, मोरबी दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी पुलाची देखभाल करणाऱ्या एजन्सीविरोधात कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात केला आहे. तसेच, गुजरात सरकारने मोरबी दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.
संबंधित बातमी- 5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांना ताब्यात घेतले आहे, त्यात पुलाचे व्यवस्थापक आणि देखभाल पर्यवेक्षकाचा समावेश आहे. याशिवाय पुलाच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व लोकांचीही चौकशी केली जात आहे. या पुलाला अद्याप फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय परवानगी न घेता सर्वसामान्यांसाठी पूल खुला केल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस अशा सर्व बाजुंनी या प्रकरणाचा तपास करणार आहे.