नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे.लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेटसमूहांतील २६ बेटांना समन्वित विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असून, त्यासाठी गेल्या जूनमध्ये ‘आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी’ही स्थापन केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लक्षद्वीपमधील १२ नव्या बेटांचा विकास होणार आहे.लक्षद्वीप हा २९ लहान-मोठ्या बेटांचा समूह आहे. त्यापैकी निम्म्या बेटांवर आदिम जमातींची वस्ती आहे. लक्षद्वीपचे प्रशासक फारुक खान यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटनासाठी खुल्या केल्या जायच्या १२ पैकी १० बेटांवर प्रथम काम सुरू होईल. पहिल्या टप्प्यात तेथे पर्यटकांसाठी सुमारे १५० निवासी खोल्यांची सोय केली जाईल. हे काम खासगी विकासकांच्या मदतीने केले जाईल. त्यासाठी विकासक, हॉटेल व्यावसायिक व सहल आयोजकांची परिषद भरविण्यात येईल.मिनिकॉय, कदमाट, अगाट्टी, चेतलाट, बित्रा, बंगाराम, तिनाकार्रा, चेरियन, सुहेली व कल्पेनी या १० बेटांवर पहिल्या टप्प्यात काम सुरू होईल. यापैकी ८४ निवासी खोल्या आधीपासून वस्ती असलेल्या बंगाराम व सुहेली या बेटांवर बांधल्या जातील. येथे खोलीचे एका रात्रीचे १५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे ही नवी सोय सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नसेल. सध्या लक्षद्वीपमध्ये अगाट्टी येथे विमानतळ आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून हवाई दलाच्या मदतीने मिनिकॉय बेटावरही विमानतळ बांधण्याची योजना आहे. जेथे ‘सी प्लेन्स’ उतरू शकतील, अशी ‘लगून्स’ही निवडली जातील.