नवी दिल्ली : स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली असून चार शहरे भाजपाशासित छत्तीसगढ, गोवा, झारखंड आणि हरियाणा राज्यातील आहेत. अन्य दोन शहरे काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश आणि मणिपूरमधील आहेत. जलद गती स्पर्धेत भाग घेतलेल्या एकूण २३ शहरांतून या तेरा शहरांची निवड करण्यात आली आहे.केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या शहरांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत सांगितले की, जलदगती स्पर्धेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या १३ शहरांनी एकूण ३०,२२९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे ३३ शहरांत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रस्तावित गुंतवणुकीचा आकडा ८०,७८९ कोटी रुपयांवर गेला आहे. जानेवारी २०१६ पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीसाठी २० शहरांची निवड करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली आहे. जलद गती स्पर्धेत एकूण २३ शहरांनी भाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, त्या राज्यांतील ही शहरे आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांच्या स्पर्धेत ज्या सात राजधानी शहरांचा समावेश केला गेला नव्हता, ती शहरे आता पुढच्या टप्प्यात अन्य शहरांसोबत स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, अशी माहितीही नायडू यांनी दिली. राजधानीच्या शहरांत पाटणा (बिहार), शिमला (हिमाचल ), नवीन रायपूर (छत्तीसगड), इटानगर (अरुणाचल प्रदेश), अमरावती (आंध्र), बंगळुरू आणि तिरुवअनंतपुरमचा (केरळ) समावेश आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशभरात १०० शहरे २०१९-२० पर्यंत स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठ केंद्र सरकार पुढील पाच वर्षात ४८ हजार कोटी रुपयांचे आर्थिक साह्य करणार करणार आहे. स्पर्धेअंती निवड करण्यात आलेल्या शहराला पहिल्या वर्षी २०० कोटी रुपये, त्यानंतर तीन वर्षात प्रत्येकी १०० कोटी रुपये केंद्रीय मदत दिली जाणार आहे.ही आहेत तेरा शहरे... लखनौ (उत्तर प्रदेश), चंदिगड (केंद्रशासित प्रदेश), रायपूर (छत्तीसगढ), न्यू टाऊन कोलकाता (पश्चिम बंगाल), भागलपूर (बिहार), पणजी (गोवा), पोर्ट आॅफ ब्लेअर (अंदमान-निकोबार), इम्फाळ (मणिपूर), धर्मशाळा (हिमाचल प्रदेश), रांची (झारखंड), वरंगल (तेलंगण), आगरतळा (त्रिपुरा) आणि फरीदाबाद (हरियाणा). नापास ठरलेली शहरे... दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत अयशस्वी ठरलेली ही आहेत दहा शहरे... पासीघाट (अरुणाचल), शिलाँग (मेघालय), नामची (सिक्कीम), दीव (दमण-दीव), औलगरेट (पुडुच्चेरी) कवरत्ती (लक्षद्वीप) आणि डेहराडून (उत्तराखंड)
आणखी १३ शहरे स्मार्ट
By admin | Published: May 25, 2016 1:34 AM