नवी दिल्ली : घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे सुमारे दोन हजार जादा जवान आणि विशेष निगराणी उपकरण बसविण्यात आले आहे. पाकिस्तानलगतच्या सीमेवर गुप्तचर जाळे, अन्य संस्थांशी समन्वय बळकट करणे आणि विशेष मोहीम चालविण्यासाठी जादा कर्मचारी, निगराणी उपकरण, वाहन आणि पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. घुसखोरीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या सीमेवरील चौक्यांची संवेदनशीलतेचे आकलन करण्यात आले असून, तेथे जादा संसाधनांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेवरील दबदबा बळकट करण्यासाठी अत्याधुनिक निगराणी उपकरणे बसविण्याचे सतत प्रयत्न केले जात आहेत.गस्त, सीमेची निगराणी करणे आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमांवर चौकी स्थापन करून सीमेची २४ तास निगराणीच्या माध्यमातून सीमेवर आपला दबदबा कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील नदी भागात बीएसएफ वॉटर क्राफ्ट आणि स्पीड बोटींनी गस्त घालून दबदबा कायम ठेवून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने यावर्षी आतापर्यंत पाच घुसखोरांना यमसदनी पाठवले आहे, तर अन्य १३ जणांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षी राज्यात ३९ घुसखोर मारले गेले होते आणि अन्य १६ जणांना पकडण्यात आले होते. २०१२ मध्ये १६ घुसखोर ठार झाले होते आणि अन्य नऊ जणांना अटक करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारत-पाक सीमेवर २,000 जादा जवान
By admin | Published: July 21, 2014 2:11 AM