नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचं चित्र असून कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत कोरोना लसीच्या लसीकरण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात अत्यंत वेगाने कोरोना लसीकरण अभियान सुरू आहे. आतापर्यंत एकूण 25 लाख लोकांना लस टोचण्यात आल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी "आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आज दुपारी दोन वाजता 25 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस टोचली गेली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. देशात सध्या 1 लाख 75 हजार कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. भारतात सर्वात वेगाने लाखो लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे" अशी माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची लस टोचल्यानंतर आतापर्यंत 16 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. तसेच हे प्रमाण एकूण लोकांच्या 0.0007 टक्के इतकं आहे. आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लस टोचल्याने झालेला नाही. याशिवाय कोरोना लसीचा कोणताही गंभीर परिणाम आढळलेला नाही अशी माहिती दिली आहे. याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे. देशभरातील तब्बल 147 जिल्ह्यांमध्ये मागील सात दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.
आनंदाची बातमी! देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही
18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत तर सहा जिल्ह्यांमध्ये मागील 21 आणि 21 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या 70 टक्के केसेस या महाराष्ट्र व केरळमधील असून आतापर्यंत भारतात 153 यूके व्हेरिएंटची प्रकरणं आढळली असल्याचं देखील डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,07,01,193 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,53,847 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,666 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. उपाचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशाच्या रिकव्हरी रेटमध्ये ही वाढ होत आहे. आणि मृत्यूदरामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 27 जानेवारीपर्यंत देशभरात 19,43,38,773 नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यापैकी 7 लाख 25 हजार 653 नमूने काल तपासले गेले असल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.