चंदीगड : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाल किल्ला आणि दिल्लीतील विविध भागात झालेल्या आंदोलनात या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात बहुतांश तरुण असल्याचे सांगितले जात आहे. यामागे दिल्ली पोलिसांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पंजाबमधील विविध शेतकरी आणि धार्मिक संघटनांनी आरोप केला आहे की, दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर ४०० शेतकरी आणि तरुण मंडळी बेपत्ता झाली आहेत. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्या सर्वांना बेकायदा पद्धतीने ताब्यात ठेवले आहे, असा दावा अमृतसर येथील खालडा मिशन यांनी केला आहे. या प्रकरणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय संघटनांकडून घेण्यात आला आहे.
'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
कोणत्याही ठोस कारणांशिवाय पोलीस अधिक कालावधीपर्यंत ताब्यात ठेवू शकत नाही. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेची संपूर्ण तयारी झाली आहे, असे पंजाबमधील मानवाधिकार संघटनेचे तपास अधिकारी सरबजीत सिंग वेरका यांनी सांगितले.
बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास वकील सरसावले
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील काही वकीलही बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास सरसावले आहेत. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि तरुण मंडळी अद्यापही संबंधित शिबिरात परत आलेली नाहीत. वकिलांचे एक पथक बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती वकील हाकम सिंग यांनी दिली.
मोगाचे ११ जण तिहार कारागृहात!
दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्यांपैकी मोगा जिल्ह्यातील ११ तरुण तिहार कारागृहात आहेत. नांगलोई पोलिसांनी त्यांना अटक केली होती, असा दावा दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला आहे. यासंदर्भात कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.