ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - भारतातील पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. यामध्ये दक्षिणपूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिक परिसरातील भारतीयांची संख्या जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जारी केलेल्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार चीन आणि भारत सर्वात जास्त तणावात असलेल्या देशांच्या यादीत आहेत. जगभरात तणावग्रस्त असलेल्यांची संख्या जवजवळ 32.2 कोटी असून, यातील 50 टक्के फक्त भारत आणि चीनमध्ये आहे.
2005 ते 2015 दरम्यान तणावग्रस्त लोकांची संख्या 18 टक्क्यांनी वाढली असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तणावाव्यतिरिक्त भारत आणि चीनमध्ये 'चिंता' हीदेखील एक मोठी समस्या आहे. भारत आणि इतर मध्यम उत्पन्न देशांमध्ये चिंताग्रस्त असणं आत्महत्येचं एक मुख्य कारण आहे. 2015 मध्ये भारतात 3.8 कोटी लोक चिंताग्रस्त सारख्या समस्येमुळे पीडित होते.
पुरुषांशी तुलना करता महिलांमध्ये तणाव आणि चिंतेची समस्या जास्त असल्याचं जाणवलं आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये एकूण 78 टक्के लोक आत्महत्या करत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 2012 मध्ये भारत आत्महत्या करणा-यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता.