तिरुवनंतपुरम – देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. अशातच देशात सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आढळून येत आहेत. केरळमध्ये जवळपास ९ जिल्ह्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अनेकजण पुन्हा एकदा बाधित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत ४० हजार कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यात पथनमथिट्टा येथील रिपोर्ट धक्कादायक आहे.
केरळमध्ये लसीचा एक डोस घेतलेले १४ हजार ९७४ तर दोन्ही डोस घेतलेले ५ हजार ४२ जण कोरोना संक्रमित झाल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केरळमध्ये लसीकरण झालेल्या ४० हजार लोकांना कोरोना संक्रमण झालं आहे. विशेषत: लसीकरणानंतर संक्रमित झाल्यास ब्रेकथ्रू इन्फेक्शन होतं. परंतु यूएसच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रिवेंशन(सीडीसी) मते, ब्रेक थ्रू इन्फेक्शन त्याला म्हटलं जातं ज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांमध्ये किंवा त्यापेक्षा अधिक काळात कुठलाही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला असेल.
कोरोनाचा नवा व्हेरिएंटतर नाही?
केरळमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्ण वाढत असल्याने केंद्राने राज्य सरकारला जीनोम सीक्वेंसिंगचा शोध घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचा कोणता नवा व्हेरिएंट आहे का? याची माहिती मिळेल. अमूमन ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे जास्त प्रकरणं समोर आल्यानंतर पहिला संशय असा होतो की, हा कोविडचा असा व्हेरिएंट असावा जो लसीपासून मिळणाऱ्या इम्युनिटीलाही चकमा देत आहे.
केरळमध्ये लसीकरणानंतर संक्रमितांची संख्या पथनमथिट्टा जिल्ह्यात जास्त आहे. याठिकाणी लसीचा पहिला डोस घेणारे १४, ९७४ लोक संक्रमित आढळले आहेत तर दुसरा डोस घेणारे ५ हजारांपेक्षा जास्त लोकांना पुन्हा कोरोना झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी दिव्या एस अय्यर यांनी पुष्टी करत म्हणाल्या की, ५ हजार ४२ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील २५८ असे आहेत ज्यांना लस घेतल्यानंतर २ आठवड्यात कोरोना झाला आहे. त्याचप्रमाणे १४ हजार ९७४ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर संक्रमित झाले आहेत. त्यातील ४ हजार ४९० लोकं लस घेतल्यानंतर २ आठवड्यात संक्रमित झाले आहेत. परंतु दिलासादायक म्हणजे व्हॅक्सिन घेतलेल्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज खूप कमी प्रमाणात पडत आहे.
केंद्रीय पथक केरळमध्ये दाखल
केरळमध्ये ६ सदस्यीय केंद्रीय पथक कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालं आहे. ब्रेकथ्रू इन्फेक्शन कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड दोन्ही लसी घेतलेले लोक संक्रमित आढळले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार टीमने लस घेतल्यानंतर इन्फेक्शनमागे व्हायरसच्या नव्या म्यूटेशनची शक्यता वर्तवली आहे ज्यामुळे लोकांची इम्युनिटी पॉवर कमी होत आहे.
तर दुसरीकडे केरळमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी कोरोना व्हायरस संक्रमणाचे २१ हजार ४४५ रुग्ण आढळले तर १६० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील संक्रमित रुग्णांची संख्या ३६ लाख ३१ हजार ६३८ झाली असून कोविडमुळे आतापर्यंत १८ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.