लखनौ - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना राजकीय नेत्यांकडून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातही सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता अनेकांना आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा महाआघाडी 60 हून अधिक जागा जिंकणार, तर उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात भाजपा भुईसपाट होणार, असा दावा आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतरच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा करण्यासाठी आपचे नेते संजय सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशाच महाआघाडीला मोठा विजय मिळेल, असे भाकीत केले.''उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा महाआघाडी 60 हून अधिक जागा जिंकणार, तर उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात भाजपा भुईसपाट होईल. याआधीच्या इतिहासाप्रमाणे यावेळीही एक्झिट पोल खोटे ठरतील. तसेच विरोधी पक्ष केंद्रात एक मजबूत सरकार स्थापन करतील,''असे संजय सिंह म्हणाले.
यावेळी अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या चर्चेबाबतही संजय सिंह यांनी संक्षिप्त माहिती दिली. ''लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांनंतर जाही होणार आहे. त्यामुळे निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी आम्ही चर्चा केली. भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्यास आमचे प्राधान्य आहे.'' असे संजय सिंह यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने येथील निकालांबाबतचा संभ्रम वाढला आहे. एकीकडे इंडिया टुडे-माय अॅक्सिस, टुडेज् चाणक्यसारख्या संस्थांनी उत्तर प्रदेशात भाजपाला बंपर यश मिळेल असे भाकीत केले आहे. तर एबीपी-नेल्सन आणि सी-वोटरसारख्या सर्वेक्षण संस्थानी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावतींच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच आघाडीवर राहील असा अंदाज वर्तवला आहे. विविध संस्थांच्या एक्झिट पोलवर नजर टाकल्यास टाइम्स नाऊ व्हीएमआरने भाजपाला 58, महाआघाडीला 20 तर काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. तर इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाने भाजपाला 62 ते 68, महाआघाडीला 10 ते 16 आणि काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. त्याशिवाय न्यूज 24-टुडेज चाणक्यनेही आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 65 तर महागठबंधनला 13 आणि काँग्रेसला दोन जागा दिल्या आहेत. रिपब्लिक-जन की बात ने भाजपाला 46 ते 57 तर महाआघाडीला 15 ते 29 जागा आणि काँग्रेसला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर एबीपी-नेल्सनने आपल्या एक्झिट पोलचा कौल महाआघाडीच्या पारड्यात टाकला आहे. एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 33 तर महाआघाडील 45 जागा आणि काँग्रेसला केवळ 2 जागा मिळतील. सी-वोटरनेही उत्तर प्रदेशात महाआघाडीचे पारडे जड दाखवले आहे. सी-वोटरच्या पोलनुसार भाजपाला 38 तर महाआघाडीला 40 जागा मिळण्याची शक्यता आहे.