नवी दिल्ली : देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८९ लाखांपेक्षा अधिक झाली असून, त्यांचे प्रमाण ९४.०३ टक्के आहे. बुधवारी कोरोनाचे ३६,६०४ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९४.९९ लाखांवर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९४,९९,४१३ व बरे झालेल्यांचा आकडा ८९,३२,६४७ झाला आहे. बुधवारी या संसर्गामुळे आणखी ५०१ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,३८,१२२ झाली आहे. देशामध्ये कोरोनाचे ४,२८,६४४ सक्रिय रुग्ण आहेत.
जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये प्रथमस्थानी असलेल्या अमेरिकेत या संसर्गाचे १ कोटी ४१ लाख रुग्ण असून, त्यातील ८३ लाख ३३ हजार जण बरे झाले. ब्राझीलमध्ये ६३ लाख ८८ हजार कोरोना रुग्ण आहेत.
युरोपमध्ये कोरोनाचा फैलाव काही प्रमाणात कमीयुरोपमधील पूर्वेकडचे देश वगळता या खंडाच्या अन्य भागांमध्ये कोरोना साथीच्या फैलावाचे प्रमाण कडक लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, पूर्व युरोपातील देशांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची स्थिती अधिक भीषण आहे.