ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या मोबाईल कंपन्यांविरोधात गेल्या तीन वर्षात ग्राहकांच्या सर्वाधिक जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे बुधवारी संसदेत सांगण्यात आले. केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल कंपन्यांविरोधात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) तक्रारी दाखल झाल्या असून यामध्ये खराब सेवा व कॉल ड्रॉप्सच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे 2016 मधील पहिल्या सहा महिन्यात निम्यापेक्षा जास्त एअरटेलच्या विरोधात आहेत. ट्रायकडे 30 जून 2016 पर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, खराब सर्व्हिस असल्याच्या 9720 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात एअरटेलविरोधात 3257, व्होडाफोनच्या विरोधात 2130, रिलायन्सविरोधात 1526 आणि आयडियाच्याविरोधात 997 तक्रारी आल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच, 2015 मध्ये ट्रायकडे मोबाईल कंपन्यांविरोधात 6131 तक्रारी आल्या होत्या.