नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा १३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करताना भारत प्रथम हेच आमचे ध्येय, अशी घोषणा देत देशाचे ऐक्य, अखंडता, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची शपथ घेतली. देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये, तसेच अनेक शहरांत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन काँग्रेसतर्फे करण्यात आले होते.दिल्लीतील कार्यक्रमास पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, ए. के. अँथनी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर नेत्यांनी टीका केली. देशात अस्थैर्य, आर्थिक संकट व भयाचे वातावरण मोदी सरकारने केले असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. लखनौमध्ये सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील पक्षाच्या योगदानाचा आणि स्वातंत्र्योत्तर काळात पक्षाने देशात घडवून आणलेल्या सुधारणांचा आवर्जून उल्लेख केला. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार देशाला अंधाराकडे नेऊ पाहत आहे. देशातील गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केरळमध्येही मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, तसेच रमेश चेन्नीतला यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेन्नई, पुडुचेरी, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, पाटणा, चंदीगड, रांची येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढल्या. यंदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह दिसत होता आणि सर्व ठिकाणी काँग्रेस नेते आवर्जून हजर होते.राजस्थानच्या जयपूरमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट सहभागी झाले होते, तर भोपाळमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ, रायपूरमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यात भाग घेतला.नोटाबंदीपेक्षा सीएए भयंकरआसाममध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा गरिबांचे व आदिवासी भटक्या व विमुक्तांचे अधिकार काढून घेण्यासाठी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकार नोटाबंदीपेक्षाही भयंकर प्रकार करू पाहत आहे. लोकांचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष यशस्वी होऊ देणार नाही.
काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 1:31 AM