ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारतामध्ये पाच वर्षांहून कमी वय असलेली अर्ध्यांहून जास्त मुलं अशक्त (अॅनीमिक) असल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. या सर्व मुलांमध्ये रक्ताची कमतरता, थकवा, सारखं आजारी पडणे अशी लक्षणं दिसत असून या सर्वांचा मेंदूच्या विकासावर परिणाम होत आहे.
2015-16 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात सहा लाख कुटुबांमधील एकाच वयोगटातील 38 टक्के मुलांची उंची कमी होती. 36 टक्के मुलांचं वजन जास्त, तर 21 टक्के मुलं अशक्त आढळली.
2011मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे 2015 मध्ये भारतात पाच वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांची संख्या एकूण 12.4 कोटी असल्याचा अंदाज आहे. यामधील 7.2 कोटी मुलं अॅनीमिक, 5 कोटी मुलं कमी उंची, 2.6 कोटी मुलं अशक्त आणि 4.4 कोटी मुलांचं वजन कमी असल्याचं समोर आलं होतं. 2005-06 मधील आकड्यांशी तुलना करता परिस्थिती खूपच वेगळी आहे.
ही आकडेवारी अशक्त सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आरसा आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. सर्व्हेक्षणातून असंही लक्षात येतं की अनेक गरोदर महिला स्वत: अॅनीमिक असल्याने त्याचा सरळ परिणाम त्यांच्या होणा-या मुलांवर पडतो. सर्व्हेक्षणानुसार 25 ते 49 वयोगटाकील 53 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुष अॅनीमिक होते.
बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान आणि छत्तीसगडमधील आकडेवारी सर्वात जास्त असून हरियाणा, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमधील हा आकडा कमी असला तरी समाधानकारक नाही. तामिळनाडूत 51 टक्के मुलं अशक्त आणि कुपोषित असून केरळमध्ये प्रत्येक तीन मुलांमागे एका मुलाला हा आजार आहे.