ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी एक जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. जीएसटी लागू केल्यानंतर जवळपास लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जीएसटीमुळे टॅक्स, अकाऊंटिंग आणि डाटा एनलिसिस क्षेत्रांत नोक-या निर्माण होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, जीएसटीमुळे रोजगार क्षेत्रात क्रांती घडणार आहे. तसेच या क्षेत्रात वर्षागणिक 10 ते 13 टक्के नोक-यांमध्ये वाढ होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतल्या व्यावसायिक मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. इंडियन स्टाफिंग फेडरेशनची अध्यक्षा रितूपर्णा चक्रबर्ती यांच्या मते, जीएसटी वस्तूंच्या खरेदी आणि वितरणात तेजी आणणार आहे. त्यामुळे साहजिकच पारदर्शकता वाढणार आहे. रोख प्रवाहाचा अंदाज घेणंही सोपं जाणार असून, नफ्यातही वाढ होणार आहे. या कारणास्तव 10 ते 13 टक्क्यांनी रोजगाराची निर्मिती होणार आहे. ग्लोबल हंटचे एमडी सुनील गोयल यांच्या मते, जीएसटी लागू झाल्यास एक लाख नोक-या तात्काळ उपलब्ध होतील. या नोक-या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर 50 ते 60 हजार नोक-या भविष्यात उपलब्ध होणार आहेत. मध्यम आणि लघु कंपन्यांही नोकरी सल्लागार कंपन्यांकडून लोकांना कामावर ठेवण्यासाठी आग्रही असतील. मॉन्स्टर. कॉमचे आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्व एमडी संजय मोदी यांच्यानुसार, नवी कर प्रणाली व्यावसायिकतेवर सकारात्मक परिणाम करेल, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार आणि कंपन्याही आकर्षित होणार आहे. सरकारला सुद्धा विविध योजना लागू करण्यासाठी मदत मिळणार असून, नोक-यांचीही संधी वाढणार आहे.
जीएसटी लागू झाल्यास निर्माण होणार लाखांहून अधिक नोक-या
By admin | Published: June 25, 2017 4:01 PM