कानपूर - भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. "भारतातपाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. बागपतमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
"सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 32 कोटी आहे. तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या 20 कोटींपर्यंत पोहचली आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्याक दर्जा तत्काळ प्रभावाने संपुष्टात यावा" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. तसेच देशाच्या लोकसंख्येविषयी बोलताना वाढत्या लोकसंख्येच्या चाचणीसाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावरून त्यांनी इतर पक्षांवर निशाणा साधला आहे. सरकार कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यास तयार आहे. राम मंदिराप्रमाणेच काँग्रेस आणि इतर विरोधी राजकीय पक्षांनी कृषी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायला हवी. भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवली जात आहे असं देखील साक्षी महाराजांनी म्हटलं आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणेच योगी सरकारनेही उत्तर प्रदेशात 'लव्ह जिहाद'विरूद्ध कायदा आणण्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. दरम्यान, याविषयी बोलताना याआधी लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींची बोली लावली जाते, असं विधान साक्षी महाराज यांनी केलं होतं.
लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावली जाते बोली - साक्षी महाराज
"लव्ह हा एक चांगला शब्द आहे. लव्ह प्रेम विवाहाची परंपरा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हापासून सुरू आहे. यात कोणालाही आक्षेप नाही. मात्र, ज्यावेळी जिहाद जोडला जातो, त्यावेळी ते विषबाधा होते. लव्ह जिहाद हिंदूच्या मुलींना खोटी नावे ठेवून फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून दहशतवादी जन्माला घातला जातो आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते." याचबरोबर, प्रेम विवाह 99 टक्के यशस्वी असतात, पण लव्ह जिहाद 99 टक्के अपयशी ठरतात. तर लव्ह जिहादचे पैसे परदेशातून येतात. जिथे कट्टर हिंदूच्या मुलींची किंमत 11 लाख रुपये आहे. ब्राह्मण ठाकूर आणि ओबीसी मुलींच्या वेगवेगळ्या किंमती निश्चित आहेत. तसेच, मदरसे व मशिदीमधून हे चालविले जाते, असा दावा साक्षी महाराज यांनी केला होता.