नितीन अग्रवाल नवी दिल्ली : सुरक्षा दलांमध्ये एक लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असली तरी भरती प्रक्रियेची गती फारच हळू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत सुरक्षा दलांमध्ये ५५ हजार पदांसाठी लेखी आणि शारीरिक परीक्षा होऊनही दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून भरती प्रक्रिया सुरूच आहे.
यादरम्यान, रिक्त पदांची संख्या वाढून एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. निमलष्करी दलांशी संबंधित संघटन कॉन्फडेरेशन आॅफ पॅरामिलिटरी दलाचे सरचिटणीस रणबीर सिंह यांचे म्हणणे असे की, आॅगस्ट २०१८ मध्ये जवळपास ५४,९५३ पदे भरतीसाठी जाहिरातीसह प्रक्रिया सुरू केली गेली होती. त्यात ४७,३०७ पदे पुरुषांसाठी व ७,६४६ पदे महिलांसाठी होती. या पदांसाठी लेखी व शारीरिक परीक्षाही झाली; परंतु दोन वर्षांनंतरही भरती प्रकिया पूर्ण झाली नाही.
यादरम्यान, अनेक योग्य उमेदवार वय वाढल्यामुळे स्पर्धेतून बाद होतील. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत जात आहे. भरतीला होत असलेल्या विलंबाचा मुद्दा गृहमंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाकडे उपस्थित करण्यात आला आहे. भरतीला होत असलेल्या विलंबावर गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून, भरतीसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयांतर्गत ६०,२१० कॉन्स्टेबल, २,५३४ उपनिरीक्षक तथा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमाद्वारे कमेंडेटच्या ३३० पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.