नवी दिल्ली : मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार प्रताप सुधीर मोरे यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अनोखा सन्मान केला आहे. मोरे यांना राष्ट्रपती भवनात पंधरवड्यासाठी वास्तव्याचे मिळालेले निमंत्रण त्याचीच साक्ष देत आहे. राष्ट्रपतींनी गेल्या वर्षी ‘इन- रेसिडन्स’ कार्यक्रम सुरू केला असून त्याचाच भाग म्हणून त्यांनी चार कलाकार आणि लेखकांना राष्ट्रपती भवनात वास्तव्यासाठी नुकतेच निमंत्रण पाठविले आहे. हे चौघेही साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट्सचे पदाधिकारी तसेच प्रमुख कलावंत आणि लेखकांशी संवाद साधतील. दिल्लीतील ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये आणि आर्ट गॅलरींना भेट देण्याची संधीही त्यांना मिळणार आहे. यिशे डोमा भुतिया(गंगटोक), डॉ. वेमपल्ली गंगाधर(कडप्पा- आंध्र प्रदेश), राहुल सक्सेना (चेन्नई) या अन्य तिघांचीही या कार्यक्रमांतर्गत निवड झाली आहे. मोरे अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले असून देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.डॉ. वेम्पल्ली गंगाधर हे तेलगू लेखक असून त्यांना २०११ मध्ये ‘मोलाकला पुन्नामी’ या साहित्यकृतीबद्दल साहित्य अकादमी युवा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यिशे डोमा भुतिया 'ा पत्रकार आहेत. त्यांनी गेल्यावर्षी सिक्कीम साहित्य सन्मान पटकावला होता. राहुल सक्सेना हे स्वत:चा उल्लेख ‘आर्टिस्ट आॅफ चेन्ज’ असा करतात.
चित्रकार मोरे यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान
By admin | Published: September 10, 2014 2:13 AM