लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला.हवामान खात्याने गेल्या १८ एप्रिल रोजी नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाचा प्राथमिक अंदाज जाहीर करताना यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असे म्हटले होते. गेल्या ५० वर्षांतील पावसाची सरासरी ८९ सेंमी गृहीत धरून त्याच्या तुलनेत पावसाचा कमी, जास्त किंवा सरासरीएवढा असा अंदाज वर्तविण्याची पद्धत आहे. यातही वर्तविलेल्या अंदाजाहून ५ टक्के कमी-जास्त पाऊस होण्याची शक्यता असते.भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मार्चपर्यंतच्या परिस्थितीनुसार १८ एप्रिलचा अंदाज वर्तवला होता. तेव्हापासून परिस्थिती अनुकूल झाल्याने सरासरीहून थोडा जास्त पाऊसही पडू शकतो.भारतात जून ते सप्टेंबर हा नैर्ऋत्य मान्सूनचा हंगाम असतो. वर्षभरातील ७० टक्के पाऊस या काळात पडत असल्याने शेतीचे गणित प्रामुख्याने या पावसावर ठरते. म्हणूनच चांगला पाऊस हा शेतीसाठी शुभवार्ता ठरतो. शेतीचे मुबलक उत्पादन हे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरते. म्हणूच केवळ शेतकरीच नव्हे तर देशाचे शासक आणि अर्थतज्ज्ञही पावसाइतकेच पावसाच्या अंदाजाकडे डोळे लावून बसलेले असतात.
सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस
By admin | Published: May 10, 2017 3:04 AM