नवी दिल्ली/ बंगळुरू/ चंदीगड : वाढता जातीय तणाव, हिंसक घटना तसेच पुरोगामी विचारवंत प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ अनेक नामवंत साहित्यिकांनी निषेधास्त्र उगारले असतानाच रविवारी साहित्य अकादमी फेलोशिपने गौरविण्यात आलेल्या हिंदीच्या नामवंत लेखिका कृष्णा सोबती यांच्यासह पंजाबचे गुरबचन भुल्लर, अजमेरसिंह औलख आणि आत्मजित सिंह या तीन दिग्गज साहित्यिकांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, तर सुप्रसिद्ध कन्नड लेखक अरविंद मलगट्टी यांनी साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.याचदरम्यान साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी एक निवेदन जारी करून साहित्य संस्था अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कर्ती असल्याचे सांगत कुठलाही लेखक वा कलाकारावरील हल्ल्याची साहित्य अकादमी निंदा करते, असे स्पष्ट केले.देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात मलगट्टी यांनी रविवारी अकादमीच्या पदाचा राजीनामा दिला. मी साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध व यावर अकादमीने बाळगलेले मौन या विरोधात मी राजीनामा दिला आहे. यापूर्वी ज्येष्ठ लेखिका आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची नयनतारा सेहगल आणि प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी यांनी दादरीतील घटना आणि पंतप्रधानांच्या मौनावर नाराजी व्यक्त करीत पुरस्कार परत केले होते. त्यानंतर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ लेखिका पद्मश्री शशी देशपांडे यांनी अकादमीच्या परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हिंदी नाटककार उदय प्रकाश तसेच सहा कन्नड लेखकांनीही आपले पुरस्कार परत केले आहेत.
साहित्यिकांचे निषेधस्वर अधिक ‘तीव्र’
By admin | Published: October 11, 2015 11:37 PM