लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसंख्या वाढ व एकूण आत्महत्यांचे प्रमाण यांच्या दराला मागे टाकून देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यांनी शेतकरी आत्महत्यांनाही मागे टाकल्याची आकडेवारी ‘आयसी३’च्या अहवालात समोर आली आहे.
एनसीआरबीच्या डेटावर आधारित “विद्यार्थी आत्महत्या : भारतात वेगाने पसरणारी महामारी” हे शीर्षक असलेल्या अहवालात भारतात आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. तर विद्यार्थी आत्महत्या करण्याचा दर दुप्पट म्हणजेच चार टक्के झाला आहे. २०२२ मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांपैकी ५३ टक्के पुरुष विद्यार्थी होते. २०२१ आणि २०२२ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ६ टक्क्यांनी वाढल्या असून, विद्यार्थिनींच्या आत्महत्या ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या किती?देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत ६२ टक्क्यांनी वाढ झाली असताना शेतकरी आत्महत्यांमध्ये १२ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर १०,८८१ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.
महाराष्ट्रात काय?२०२१ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,८३४ विद्यार्थांच्या आत्महत्या झाल्या. मध्य प्रदेशात १,३०८ आत्महत्या, तामिळनाडू १,२४६, कर्नाटकात ८५५ आत्महत्या झाल्या आहेत. या पाच राज्यांचा मिळून विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ४६% वाटा आहे. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असूनही येथे विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण कमी आहे.