नवी दिल्ली - विविध कारणांमुळे अनेकदा काहीजण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. भारतात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली आहे. प्रामुख्याने रोजगार नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. मात्र आत्महत्येमागे वेगवेगळी कारणं असून लग्न हे सर्वात मोठं कारण असल्याची माहिती आता समोर आली आहे. 2010 आत्महत्येच्या घटनांमध्ये घट नोंदवण्यात आली होती, ज्यानंतर या घटना कायम कमी होत गेल्या. मात्र 2015 मध्ये पुन्हा एकदा आत्महत्या वाढल्याने चिंताही वाढली होती.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) शुक्रवारी (8 नोव्हेंबर) 2016 या वर्षातील आकडेवारी जारी केली आहे. रिपोर्टमध्ये कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली गेली, त्याची काही कारणेही देण्यात आली आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये आत्महत्येची कारणं वेगवेगळी आहेत. आजारपण आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येमागची दोन प्रमुख कारणं आहेत. तसेच महिला आणि पुरुष यांच्या आत्महत्येची कारणं वेगवेगळी आहेत. महिलांमध्ये आत्महत्येची सर्वात मोठी कारणं ही लग्न, प्रेम आणि परीक्षेत अपयश ही असल्याचं समोर आलं आहे. तर पुरुषांमध्ये व्यसनाधिनता, दिवाळखोरी आणि लग्नाची समस्या ही कारणं आहेत.
2016 मध्ये लग्नातील समस्या, आजारपण, संपत्ती वाद आणि प्रेमसंबंध यामुळे आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक घटना नोंदवण्यात आल्या. परीक्षेत अपयश, पैशांची कमतरता, बेरोजगारी आणि गरीबीमुळे आत्महत्या केल्याच्या कमी घटना होत्या. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त आत्महत्या करतात. फाशी घेऊन किंवा विष प्राशन करुन बहुतांश आत्महत्या झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच रशिया, जपान, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतात आत्महत्येचा दर हा कमी आहे.
महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नॅशनल हेल्थ प्रोफाईल- 2019 च्या माध्यमातून समोर आले आहे. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली, तरी नैराश्य हे मोठं कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. राज्यात शेतकऱ्यांसोबतच तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. आत्महत्येची कारणं वेगवेगळी असली, तरी यातील बहुतांश आत्महत्येचे प्रकार हे नैराश्यातून घडल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या ‘नॅशनल हेल्थ प्रोफाईल-2019’मध्ये देशभरातील आत्महत्येचे गंभीर चित्र स्पष्ट केले आहे.