भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने गोमुत्रावरील केलेल्या एका संशोधनावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोमुत्र हे मानवी शरीरासाठी योग्य नाहीय असे या संशोधनामध्ये समोर आले आहे. संशोधकांना गोमुत्रामध्ये १४ प्रकारचे धोकादायक बॅक्टेरिया मिळाले आहेत.
गोमुत्राद्वारे कॅन्सरसारख्या आजारांवर उपचार करता येतो, असा दावा एकीकडे केला जात असताना या संशोधनाचा अहवाल गोमुत्र आरोग्यासाठी ठीक नसल्याचे सांगत आहे. आयुर्वेदामध्ये गोमूत्रच नव्हे, तर म्हैस, मेंढी, बकरी, उंट, गाढव, हत्ती इत्यादी अनेक प्राण्यांच्या मूत्राचा वापर उपचार करण्यासाठी करण्याचा उल्लेख आहे.
आयव्हीआरआयचे शास्त्रज्ञ डॉ.भोजराज सिंह यांनी दैनिक भास्करला याबाबत माहिती दिली आहे. संशोधनानुसार गोमूत्राचे थेट सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. साहिवाल, थारपारकर आणि वृंदावनी जातीच्या गायींच्या मूत्रात ‘ई-कोलाय’सह १४ प्रकारचे विषाणू आढळून आले आहेत. या विषाणूंमुळे गंभीर आजार होऊ शकतात, असे ते म्हणाले.
याचबरोबर गायीपेक्षा म्हशीच्या मूत्रामध्ये बॅक्टेरियांना मारण्याची जास्त ताकद असते असे देखील समोर आले आहे. जे मूत्र शरीराच्या बाहेर टाकाऊ म्हणून फेकून दिले जाते ते फायद्याचे कसे ठरते हे आयुर्वेदातील तज्ञच सांगू शकतील असेही भोजराज यांनी म्हटले आहे.
गोमूत्रात किती प्रकारचे घटक असतातNCBI वर उपलब्ध अमृतसर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार गोमूत्रात 95 टक्के पाणी, 2.5 टक्के युरिया, खनिजे, 24 प्रकारचे क्षार, हार्मोन्स आणि 2.5 टक्के एन्झाइम्स असतात.
आयुर्वेद तज्ञ काय सांगतात...भोजराज यांच्या संशोधनावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ठाकूर राकेश सिंग यांनी आपले मत मांडले आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा गोमूत्राशी संबंधित प्रयोग झाले आणि आयुर्वेदाची पुस्तके लिहिली गेली तेव्हा गायींच्या चाऱ्यात रसायने आणि कीटकनाशके नव्हती. आज वातावरणातील हवा विषारी झाली आहे, अन्नात विष आहे. अशा परिस्थितीत निरोगी गाय आणि शुद्ध गोमूत्र मिळणे तेवढे सोपे राहिलेले नाहीय, असे ते म्हणाले.
गोमुत्राचा वापर औषधे बनवताना त्यांच्या शुद्धीकरणासाठी, एनिमाद्वारे आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि औषधात टाकून लेप लावण्यासाठी तसेच गोमूत्र अर्काच्या सेवनासाठी केला जातो. परंतू आजकाल अनेकजण यूट्यूब आणि इंटरनेट पाहून गोमुत्र विकत घेतात किंवा आजुबाजुच्या गायींपासून ते मिळवतात आणि पितात. ही पद्धत चुकीची आहे, असे सिंग म्हणाले.