मुझफ्फरनगर-
गुजरात एटीएसला ड्रग्ज विरोधातील कारवाईत मोठं यश प्राप्त झालं आहे. एटीएसनं शाहीन बाग येथून अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर हैदरशी निगडीत यूपीतील मुझफ्फरनगर येथील अड्ड्यावरुन १५० किलोहून अधिक हेरॉइन जप्त केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनची किंमत तब्बल ९०० कोटी रुपये इतकी आहे.
हैदरला एनसीबीनं शाहीन बाग येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. शाहीन बागमधील त्याच्या घरातून ३०० कोटी रुपये किमतीचे ५० किलो हेरॉइन, ३० लाख रोकड आणि ४७ किलो इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गुजरात एटीएसनं हैदरच्या मुझफ्फरनगर येथील घराच्या शेजाऱ्याच्या घरावर छापा टाकला आणि तब्बल १५० किलो हेरॉइन जप्त केलं.
आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडएनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणात लक्ष्मीनगरमधून हवाला व्यापारी शमीम याला अटक केली आहे. हाच व्यक्ती ड्रग्जचे पैसे दुबईमध्ये शाहिदला पाठवत होता. आतापर्यंत या सिंडिकेटमध्ये एकूण ५ लोकांना अटक करण्यात आली आहे. या सिंडिकेटचं कनेक्शन थेट दुबई, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणशी असल्याचं समोर आलं आहे.
अटारी बॉर्डर आणि गुजरातमध्ये जे हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे त्या सर्वांचा सोर्स एकच असल्याचं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. यासाठी आमची टीम गुजरात आणि अटारी बॉर्डरवर पकडण्यात आलेल्या आरोपींचीही चौकशी करणार आहे. आम्ही जे आरोपी पकडले आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी कस्टम विभागाची टीम आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शाहीन बागमध्ये जप्त करण्यात आले ड्रग्जएनसीबीनं दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातून याआधी ५० किलो हेरॉइन जप्त केलं होतं. याशिवाय ३० लाख रोकड, नोटा मोजण्याचं मशीन आणि काही किलो इतर अंमली पदार्थ जप्त केले होते. या हेरॉइनची किमत ४०० कोटी रुपये सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात इंडो-अफगाण सिंडिकेटचा खुलासा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधून ड्रग्जची खेप दिल्लीला आली होती. ड्रग्जच्या सर्व खेप फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये बंद करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.