आंब्याच्या बागेत २४ हून अधिक माकडांचा मृत्यू; विषबाधा झाल्याचा संशय; ७ आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:37 PM2023-06-20T18:37:08+5:302023-06-20T18:37:34+5:30
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथे एक एकराच्या आंब्याच्या बागेत जवळपास २४ माकडांचे मृतदेह आढळले.
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथे एक एकराच्या आंब्याच्या बागेत जवळपास २४ हून अधिक माकडांचे मृतदेह आढळले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बागेत धाव घेतली. बागेची देखभाल करणाऱ्यांनीच माकडांना विष देऊन मारले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून ५-७ लोकांना ताब्यात घेतले आहे.
उधम सिंह नगरातील काशीपूर येथे झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. आंब्याची बाग असलेली जमीन शेजारील राज्य उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीची आहे. त्याने दोन वर्षापूर्वी ही जमीन भाड्याने दिली होती. जेव्हा स्थानिक लोक त्यांच्या जनावरांसाठी चारा नेण्यासाठी बागेत पोहोचले तेव्हा त्यांना एक माकड आपल्या मृत आईला मिठी मारून रडताना दिसले.
खड्ड्यात आढळली मृत माकडे
आपल्या आईचा मृतदेह पाहून रडत असलेल्या माकडाला पाहून स्थानिकांनी त्याला सुरक्षितस्थळी नेले. यादरम्यान, ग्रामस्थांना आंब्याच्या बागेत अनेक ठिकाणाहून दुर्गंधी येत होती. त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या भागात खोदले असता त्यांना अनेक माकडे खड्ड्यात गाडलेली आढळून आली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १५ वर्षापासून ही बाग भाड्याने दिली जात आहे. त्यांनी या बागेची देखभाल करणाऱ्या लोकांवर माकडांना विष देऊन मारण्याचा आरोप केला आहे.
दोषींवर कठोर कारवाई केली जाईल - पोलीस
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अधिक माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी बागेची देखभाल करणाऱ्या सर्व ५-७ जणांना ताब्यात घेतले. तर, मृत माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.