दिल्लीतील वसंत कुंज येथील सिंधी कॉलनीत घडलेल्या अत्यंत दुर्देवी घटनेनं लोकांना धक्काच बसला नाहीये तर त्यांची चिंताही वाढवली आहे. या ठिकाणी पाच ते सहा भटक्या श्वानांनी दोन सख्ख्या भावाचं जीवन संपवलं. दरम्यान, तीन दिवसांत दोन्ही भावांचा मृत्यू झाला. मुलांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या शरीरावर श्वानांनी चावल्याच्या ३० हून अधिक जखमा होत्या. इतकंच नाही तर त्या श्वानांनी त्यांच्या शरीराचे लचकेही तोडले. अनेक अवयवांची केवळ त्वचा उरली होती. मुलांच्या शरीराचे अनेक भाग टाके घालून जोडलेले असल्याचंही सांगण्यात आलं.
पहिली घटना शुक्रवारी घडली. सात वर्षीय आनंदवर भटक्या श्वानांनी हल्ला केला. तर दुसरी घटना रविवारी सकाळी घटली. पाच वर्षीय आदित्यवर श्वानांनी हल्ला केला. त्या ठिकाणी कोणीही पोहोचेल इतक्यात त्या श्वानांनी त्याला जबर जखमी केलं. त्याच्या शरीरावर चावण्याच्या तब्बल ३० जखमा मिळाल्या आहेत.
वसंत कुंज दक्षिण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुलगा हरवल्याची तक्रार प्राप्त झाली. तक्रारीवर तातडीने कारवाई करत पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. सुमारे दोन तासांनंतर पोलिसांना जंगलातील एका भिंतीजवळ आनंदचा मृतदेह सापडला. मुलाच्या शरीरावर श्वानाच्या चावल्याच्या खुणा आणि शरीराचे अनेक भाग वेगळे झाल्याचं यावेळी दिसलं.. रविवारी सकाळी आनंदचा लहान भाऊ आदित्य त्याचा चुलत भाऊ चंदनसोबत जंगलात गेला होता. चंदन आदित्यला सोडून काही अंतरावर गेला, त्यादरम्यान श्वानांनी त्याच्यावर हल्ला केला. पोलीस अधिकारीही तपास करण्यासाठी तेथे पोहोचले. त्यांनी आदित्यला तातडीने रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं.
२२०० रुपये वाचवण्यासाठी आले होतेदोन मुलांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या आईला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे वडील मानसिक रुग्ण आहेत. आपल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची त्यांना कल्पनाही नाही. आपण २२०० रुपये वाचवण्यासाठी सिंधी कॉलनीमध्ये राहण्यास आलो होतो, असं म्हणत त्यांच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले. दरम्यान, त्या एका ब्युटी पार्लरमध्ये काम करून आपलं आणि कुटुंबाचं पोट भरत असल्याची माहिती त्यांच्या बहिणीकडून देण्यात आली. ८ महिन्यांपूर्वी त्यांचं कुटुंब या ठिकाणी राहायला आलं होतं.